मुख्य मजकुरावर जा

आमचा प्रवास

एका YouTube चॅनेलपासूनमराठी मंचापर्यंत

स्वयं टॉक्सचं चॅनेल ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झालं. उद्देश एकच — मोठ्या नावांऐवजी, मोठं काम करणाऱ्या माणसांना मंच देणं. आज ११०० हून अधिक व्हिडीओ, ३० हून अधिक मालिका आणि साडेचार लाख सबस्क्राइबर्स.

Navin Kale and Ashay Mahajan

संस्थापकांविषयी

दोन वेगळ्या जगांतून
आलेली एक समान उत्सुकता

नविन काळे आणि आशय महाजन स्वयंकडे दोन अगदी वेगळ्या जगांतून आले — पण माणसं आणि त्यांच्या गोष्टींबद्दलची उत्सुकता दोघांमध्ये सारखीच होती.

नविन यांनी दहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट जगात काढल्यानंतर गोष्टी सांगणं, लेखन आणि अर्थपूर्ण संवाद यांभोवती फिरणारं आयुष्य निवडलं. चार मराठी पुस्तकांचे लेखक आणि KuriousKale चे निर्माते असलेले नविन हे मूळचेच गोष्टीवेल्हाळ; सांगण्यासारखी माणसं, कल्पना, चित्रपट, पुस्तकं आणि अनुभव ते सतत शोधत असतात.

आशय हे चार्टर्ड अकाउंटंट; संस्थांना व्यवसाय सल्ला देण्याचा दोन दशकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी या प्रवासाला अगदी वेगळी दृष्टी दिली. आयर्नमॅन आणि अनेक मॅरेथॉन पूर्ण केलेले हे सहनशक्तीचे खेळाडू; शिस्त, उत्सुकता आणि आणखी पुढे जात राहण्याची भूक — हेच गुण ते स्वयंमध्येही आणतात.

त्यांना एकत्र आणलं ते एका साध्या विश्वासानं: असामान्य गोष्टी सगळीकडे असतात, पण त्या सांगण्यासाठी मंच सगळ्यांना मिळत नाही.

त्या विश्वासातून स्वयं टॉक्स उभं राहिलं.

या वर्षांत नविन यांची गोष्टींची जाण आणि आशय यांची माणसं जोडण्याची व नाती जपण्याची हातोटी यांतून स्वयं हे केवळ टॉक्सचं व्यासपीठ राहिलं नाही. ते उल्लेखनीय माणसं, कल्पना आणि संवादांचा वाढता समुदाय झालं — या विश्वासावर की एखादी प्रभावी गोष्ट भेटली, की माणूस स्वतःच्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं बघू लागतो.

आमची भूमिका

समाधानी आयुष्य सापडत नाही —
ते घडवावं लागतं

स्वयंचा विश्वास आहे की समाधानी आयुष्य आपल्याला नुसतं सापडत नाही — ते आपण जाणीवपूर्वक घडवत असतो. इकिगाई या विचारातून प्रेरणा घेत आम्ही लोकांना विचारतो: तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात चांगले आहात, जगाला कशाची गरज आहे, आणि तुमच्या आयुष्याला खोल अर्थ कशामुळे मिळतो.

स्वतःची वाट शोधणाऱ्या माणसांच्या गोष्टी स्वयं वर्षानुवर्षं तुमच्यापर्यंत पोहोचवत आलं आहे. पण प्रेरणा ही फक्त सुरुवात आहे, असं आम्हाला वाटतं. दुसऱ्याची गोष्ट ऐकण्यापासून स्वतःची गोष्ट घडवण्यापर्यंत — तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं ते सापडावं, तुमचा प्रवास समृद्ध करणारी माणसं भेटावीत, आणि हवं ते आयुष्य उभं करण्याच्या दिशेनं ठोस पावलं टाकता यावीत, यासाठी संवाद, नाती, समुदाय आणि अनुभव घडवण्याचा स्वयंचा प्रयत्न आहे.

"माझ्या आयुष्याचं काय करू ?" या प्रश्नाचं उत्तर कदाचित आमच्याकडे नाही. पण ते तुम्हाला स्वतःला सापडावं, यासाठी लागणारी माणसं, कल्पना आणि अवकाश तुमच्याभोवती उभा करण्याची आशा आम्ही बाळगतो.

कारण शेवटी, तुम्ही घडवू शकाल अशी सर्वांत प्रेरणादायी गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची गोष्ट.

संस्थापकांशी थेट

संस्थापकांना विचारा !

गोष्टींबद्दल, स्वयंबद्दल, किंवा स्वतःची वाट शोधण्याबद्दल — काहीही विचारा. नविन आणि आशय निवडक प्रश्नांना इथेच उत्तर देतात.

तुमचा प्रश्न विचारा

निवडक प्रश्नांना उत्तर देऊन ते या पानावर प्रसिद्ध केले जातात — तुमच्या नावासह. तुमचा ईमेल कधीही दाखवला जात नाही.